परिसरातील प्रेक्षणीय स्थळे

परिसरातील प्रेक्षणीय स्थळे  गणेशगुळे ( आगरगुळे )

        पावसहून पुढे पूर्णगडकडे जाताना वाटेत गणेशगुळे आहे. मुख्य रस्त्यापासून सुमारे ४ कि.मी. अंतरावर गणेशगुळ्याचे प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर सुमारे ४०० वर्ष जूने आहे. मंदिरबांधणी जांभ्या दगडाची असून सद्यस्थितीत त्यावर रंगरंगोटी केलेली आहे. मंदिर गाभाऱ्यात प्रचलित गणेश मुर्ती नसून भली मोठी शिळा आहे. या दक्षिणमुखी मंदिराच्या आवारात ७० फूट खोल विहीर आहे. कधी काळी गणपतीच्या नाभीतून म्हणजे शिळेतून पाण्याची संततधार वहात असे. एके दिवशी ते पाणी अचानक बंद झाले. त्यावरुन देवाने गणेशगुळ्याहून गणपतीपुळ्याला स्थलांतर केले अशी आख्यायिका प्रचलित झाली. त्यामुळेच गुळ्याचा गणपती पुळ्यात गेला अशी म्हण प्रसिद्ध आहे.

  धूतपापेश्र्वर

        राजापूरात मुख्य बाजरपेठपासून सुमारे ५ कि.मि. अंतरावर धुतपापेश्र्वराचे मंदिर आहे. पापे धुवून काढणारा तो धुतपापेश्र्वर. सभोवतालचा परिसर अतिशय रम्य असून मंदिरही प्राचीन आहे. प्रशस्त असा सभा मंडप, अंतर्गृह, गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिरात येताच क्षणी मन प्रसन्न होते. प्रवेशवरावर नगारखाना व आवारात दिपमाळ आहे. मंदिरा शेजारी काळ्या कातळावरुन खाली झोकून देणारा मृडानी नदीचा प्रवाह आहे. या धबधब्याची खरी शोभा पहावी ती भर पावसाळ्यात. वरुन खाली पाणी कोसळते ते एका डोहात. त्याचा कोटीतीर्थ म्हणतात. या मंदिरात एक सुंदर काळ्या पाषाणाची गणेशमुर्ती आहे. माघ वद्द्य १० ते फाल्गुन शु. १ असा महाशिवरात्रीचा सात दिवस उत्सव असतो.

  गरम पाण्याचे झरे उन्हाळे

        मुंबई - गोवा महामार्गावर उन्हाळे गावी छोटेसे शिवमंदिर आहे. या मंदिरापलीकडे मोकळ्या शेतजमिनीवरच्या सिमेंट काँक्रीटच्या भिंतीपलीकडे गरम पाण्याचे झरे आहेत. वर्षभर सतत कमीअधीक दाबाने येथून गंधयुक्त गरम पाणी वाहत असते. त्वचारोग बरा करण्याचे गुणधर्म या पाण्यात असल्यामुळे येथे स्नानासाठी अनेक लोक येतात. याचा उगमस्त्रोत आज मितीस दृष्टीस पडत नसला तरी पुढे गोमुखातून त्याची अखंड धारा वाहत असते. जमिनीखालून अक्षरशः उकळते पाणी बाहेर पडताना पाहून या निसर्ग नवलाचा विस्मय वाटत रहातो.

  गंगातीर्थ राजापूर

        मुंबई - गोवा महामार्गावर राजापूरच्या पुढे गंगातीर्थाचे ठिकाण आहे. या ठिकाणी चौदा कुंड आहेत. सभोवताली जांभ्या दगडाची तटबंदी आहे. मुख्य प्रवेशद्वारासमोरच काशीकुंड व गोमुख आहे. त्या शेजारी मोकळ्या जागेत वटवृक्षाखाली मूळ कुंड आहे. या मुळ कुंडात गंगेचे प्रथम आगमन होते. ही दोन्ही कुंडे भरुन वाहू लागली की इतर कुंडात पाणी येते. निसर्ग नवल म्हणजे गंधकाचा वास येणाऱ्या प्रत्येक कुंडातील पाण्याच्या तापमानात जाणवण्या इतका फरक असतो. काशी कुंडात्तील गोमुखातून पडणाऱ्या पाण्याखाली उभे रहून गंगा स्नान करता येते. काणत्याही दिवशी प्रकट होणारी गंगा हा सृष्टीचा चमत्कार मानावा लागेल. साधारपणे दर तीन वर्षांनी गंगेचे आगमन होते. अन्य वेळी ही सर्व कुंड रिकामी असतात.

  श्री कनकादित्य मंदिर

        गावखाडी नंतर सुमारे ७ कि.मी. वर उजवीकडे वळणारा रस्ता थेट कनकादित्य मंदिरापाशी पोहचतो. पुर्वेकडून आत प्रवेश वेत्र्ल्यानंतर कौलारु मंरिाला अर्धवळसा घातल्यावर प्रशस्त असा सभामंडप दिसतो. मंदिराचे अंतरंग खुपच सुंदर आहे. लाकडी खांबावर नक्षी, वेलबुट्टी, विविध देवदेवता कोरलेल्या आहेत. तर, मुख्य मंदिराच्या छतावर आतील बाजूनेही विविध देवदेवतांच्या लाकाडावर कोरलेल्या प्रतिमा आहेत. कनकादित्याची काळ्या पाषाणातील मुर्ती अप्रतिम आहे. देवासाठी चांदिचा खास रथ बनवलेला आहे. माघ शु.७ ते माघ श.११ असा पाच दिवस मंदिरात रथसप्तमीचा उत्सव असतो.

  श्री महाकाली मंदिर

        रत्नागिरी पावस मार्गे राजापुर रस्तावर आडीवरे गांव आहे. मुख्य रस्ता शेजारीच महांकालीचे कौलारु मंदिर आहे. मंदिरात श्री योगेश्वरी, श्री महांकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती व श्री रवळनाथ अशा पाच मुर्ती आहेत. मंदिरात प्रवेश करताच समोर योगेश्वरीचे मुळ स्थान आहे. त्याच्या डाव्या बाजुस श्री महांकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती ची स्थाने आहेत. तर थोडे बाजुला रवळनाथाचे मंदिर आहे. मंदिराच्या अंतर्भागात लाकाडी खांबावर, छतावर गणपती, मृदुंगी, जय विजय अशा अनेक प्रतिमा कोरल्या आहेत. महांकालीची मुर्ती चतुर्भुज असुन काळ्या पाषाणाची दक्षिणाभिमूख आहे. मस्तकावार पंचमुखीटोप, एका हातात डमरु, दुसऱ्या हातात त्रिशुल, तिसऱ्या हातात तलवार तर चौथ्या हातात पंचपात्र आहे. मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा वेत्र्ला जातो.

  श्री गोळवलकर गुरुजी स्मारक

        श्रीगुरुजी! श्री. माधव सदाशिव गोळवलकर! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक. 1940 – 1973 या काळात त्यांनी संघाचे पोषण आणि संवर्धन केले, त्याला भक्कम अखिल भारतीय आकार दिला. संघाची विचार प्रणाली त्यांनीच सूत्ररुपाने सांगितली. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात त्यांनी अनेक संस्था-संघटनांना सतत प्रेरणा दिली. श्रीगुरुजींचे जीवन अलौकिक आणि ऋषितुल्य होते. राष्ट्रजीवनाच्या विविध अंगाबाबत त्यांनी मुलभूत आणि क्रियाशील मार्गदर्शन केले. श्रीगुरुजी सर्वार्थाने राष्ट्रऋषी होते.
        संगमेश्वरच्या अलीकडे गोळवलकर गुरुजींचं गोळवली. गोळवलीत गुरुजींच्या वास्तूस्थानी काही विकास प्रकल्पही सुरू झालेत.